दि. 24.12.2023
Vidarbha News India
Shetkari Bhavan: राज्यातील 116 बाजार समित्यांना मिळणार शेतकरी भवन; दीड कोटी रुपये निधीची तरतूद.!
Shetkari Bhavan :
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे.
राज्यातील ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन उभारण्यात येईल.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे. (116 market committees of state will get Shetkari Bhavan nashik news)
राज्यात ३०६ बाजार समित्या व ६२३ उपबाजार समित्या आहेत. या सर्वांमध्ये कृषिमालाची खरेदी व विक्रीचे वर्षाकाठी सुमारे ६० हजार कोटींचे व्यवहार होतात. काही बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने रात्री कृषिमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारा उपलब्ध होत नाही. त्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे.
शेतकरी भवनाचे मॉडेलही निश्चित करण्यात आले असून, यात तळ मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, तीन दुकाने, पहिल्या मजल्यावर चार खोल्या, एकूण २० खाटांची ही इमारत असेल. प्रत्येक शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित असला, तरी त्यापैकी ५० टक्के खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे.
दुरुस्तीलाही परवानगी
सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या शेतकरी भवनाची दुरुस्तीही या निधीतून करता येणार आहे. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे शेतकरी भवन जुने किंवा जीर्ण झाले आहे, त्यांनी पणन मंडळाच्या समितीतील वास्तुविशारदांकडून शेतकरी भवनाची प्रत्यक्ष पाहणी करून घ्यावी. ते दुरुस्तीयोग्य नसल्याचे प्रमाणित झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेतून नवीन शेतकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव पाठविता येईल.
असा मिळणार निधी
नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गवारीनुसार अ आणि ब वर्गातील बाजार समित्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येईल; तर क आणि ड वर्गातील बाजार समित्यांना ७० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात अ (४३), ब (२३), क (१८), ड (३२) वर्गात बाजार समित्यांचा समावेश आहे.