दि. 24.12.2023
Vidarbha News India
Agriculture Department : थेट आयुक्तांकडूनच कृषी सहायक निलंबित.!
Amravati News :
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/अमरावती : शेतकऱ्यांना महिनोन् महिने न भेटणाऱ्या कृषी सहायक चक्क कृषी आयुक्तांच्या दौऱ्यातही अनुपस्थित राहिला. ही बाब गांभीर्याने घेत बारगावच्या या कृषी सहायकाच्या थेट निलंबनाचे आदेशच कृषी आयुक्तांना काढावे लागले.
वरुड तालुक्यातील बारगाव, जामगाव, खडका, पांढरघाटी, आंबाफाटा यांसह सात गावांची जबाबदारी विजय एम. गावंडे या कृषी सहायकाकडे आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी ही कृषी पर्यवेक्षक पदावर याच तालुक्यात कार्यरत आहे.
परंतु विजय गावंडे हे स्थानिक असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात आपली जबाबदारीच पार पाडत नव्हते, अशा विभागांतर्गत आणि शेतकऱ्यांच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला देखील खीळ बसली होती.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) कृषी आयुक्त्त्त प्रवीण गेडाम हे या भागात दौऱ्यावर होते. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांची दौऱ्यात उपस्थित होती. बारगाव येथे गेल्यानंतर स्थानिक कृषी सहायक मात्र अनुपस्थित असल्याची बाब कृषी आयुक्तांना खटकली.
अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता काहींनी ते चहा घेण्यासाठी गेल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी ते आधीच गावाकडे फिरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते आजही अनुपस्थित असतील हे आयुक्तांच्या तत्काळ लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विजय गावंडे यांच्या तत्काळ निलंबनाचे आदेश काढले.