राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ.!

दि. ०३.१२.२०२३

Vidarbha News India 

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले.

उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक आणि चपराशी या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या भरती प्रक्रियेस मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली होती. यात १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

मात्र, हे अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर विभागाकडून सोमवार, ४ डिसेंबर २०२३ च्या रात्री ११:५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी दि. ३० मे, २०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दि. ३० मे, २०२३ ते ०९ जून, २०२३ या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे, त्यांनाच त्यांच्या अर्जात दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ पासून ते दि. ०८ डिसेंबर २०२३ च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत.

याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->