दि. ११.१२.२०२३
Vidarbha News India
भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक : धर्मरावबाबा आत्राम
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (दि.१०) गडचिरोली येथे दिली.
गडचिरोली येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. शिवाय लग्न व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भोजनाची व्यवस्था असल्यास आयोजकांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आत्राम यांनी सांगितले. Dharmarao Baba Atram
अन्न व औषध प्रशासन विभागातील ७५० रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यु काळे, जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. यावेळी आत्राम यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाद्वारे संचालित मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.