दि. 07.12.2023
Vidarbha News India
ग्रामसेवकाच्या ऑनलाईन गेमने उडाली गावाची झोप, ग्रामपंचतीच्या 31 लाख रुपयांना चुना.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/भंडारा : ऑनलाईन गेमच्या नादात लाखो रुपये उडवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता जी घटना घडलीय त्याने अख्ख्या गावाची झोप उडाली आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक राकेश वैद्य याने ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात चक्क 31 लाख रूपयांची चोरी केली.
यासाठी सरपंच व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली. प्रकरणी 5 सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच, खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचा कारभार आहे. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात साईबाबा मंदिर आवार भिंत बांधकामाचे 19 लाख तसेच घर टॅक्स मिळून 29 लाख रुपये जमा होते. त्यापैकी 28 लाख 40 हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून उचल केले. तसेच पाणीपुरवठा फंडातून 50 हजार रुपये, तर अमानत फंडातून 78 हजार रुपयांची उचल केली. तसेच खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील 1 लाख 3 हजार रुपयांपैकी एक लाख रुपयांची उचल केली आहे.
चेक बाऊन्स झाल्याने गैरप्रकार उजेडात
राकेश वैद्य यास दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद जडला होता. जुगार खेळण्यासाठी त्याने सन 2022 पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे, नंतर दाखवतो, असे बोलून वेळ मारून नेत होता. दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती. त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठाधारकाने बँकेत लावला असता तो बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला.
आता हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी याची तक्रार दिली असून तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपी ग्रामसेवकांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर या विषयी ग्रामसेवक यांची बाजु जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी आपली चूक झाली असे फोनवर सांगीतले आहे. पण सद्या जिल्ह्याबाहेर असल्याने बोलू शकत नसल्याचे सांगीतले.