दि. ०२ डिसेंबर २०२३
अखेर कोनसरी परिसरातील ८९८.८४ हेक्टर आर जागेच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीला सरकारची मान्यता.!
- जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मोठे यश.!
- कोनसरीसह मुधोली चक १, मुधोली चक २, जयरामपूर, सोमनपली व पारडी देव येथील ८९८.८४२२ हे.आर खाजगी जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित लवकरच भूसंपादन होणार.!
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उद्योग क्रांती रथयात्रेचे हे फलित.
- मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे सह मानले उद्योगमंत्र्यांचे आभार.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून चामोर्शी तालुक्यातील मौजा कोनसरी, मुधोली चक १, मुधोली चक २, जयरामपूर, सोमनपली व पारडी देव येथील ८९८.८४२२ हे.आर खाजगी क्षेत्राचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कारवाई करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मेक इन गडचिरोलीचे स्वप्न बघून २०१६ -१७ मध्ये उद्योगाची निर्मिती व्हावी याकरिता संपूर्ण जिल्हयात महिनाभर फिरून उद्योग क्रांती रथयात्रा काढली. त्या यात्रेचे हे फलित असून आता जिल्ह्यात मोठ मोठे उद्योग येण्यास सुरुवात झाली. यामुळे जिल्ह्यातील हजारो युवकांना नोकरीच्या मोठ मोठ्या संधी प्राप्त होत असून भविष्यातही मोठ मोठ्या संधी मिळणार आहेत. या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांनाही त्यातून मोठा लाभ मिळणार आहे. या उद्योग क्रांती रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात लावलेले छोटेसे रोपटे आता मोठे वटवृक्ष होण्याच्या दिशेने जात आहे. त्यामुळे आमदार डॉ. देवरावजी होळी हे या जिल्ह्याच्या उद्योग क्रांतीचे जनक ठरले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चामोर्शी औद्योगिक क्षेत्राकरिता मे लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड यांना ५०.२९ हेक्टर आर क्षेत्राचा भूखंड क्र ए-१ वाटप केला असून त्यावर उद्योग कार्यरत आहे. सदर उद्योगाच्या विस्ताराकरिता या भूखंडास लागून असलेले अतिरिक्त क्षेत्र pass through पद्धतीने संपादन करण्याची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मौजा कोनसरी, मुधोली चक १, मुधोली चक २ , जयरामपूर ,सोमनपली व पारडी देव येथील ८९८.८४२२ हे.आर खाजगी क्षेत्राचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियम १९६१ अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याच्या भूसंपादन कारवाई करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.