दि. 11.01.2024
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी गोंडी माडिया भाषा लिपीचे शब्दकोश संकलन करण्याची आवश्यकता ; - आ. डॉ. देवराव होळी
- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदिवासी अध्यासन केंद्राच्या वतीने गोंडी-माडिया शब्दकोश संकलन या सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे विद्यापीठात आयोजन.!
- सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला आलेल्यांचे केले स्वागत व अभिनंदन.!
- इतक्या वर्षाच्या आक्रमणांनतरही आदिवासींची देव परंपरा कायम.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारतावर अनेक वर्ष परकीय लोकांचे आक्रमण झाले त्यात आदिवासी बांधवांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. माञ इतक्या वर्षांच्या आक्रमणांनतरही आदिवासींची देव परंपरा कायम असुन आदिवासी संस्कृती जपण्यासाठी गोंडी माडिया भाषा लिपीचे शब्दकोश संकलन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदिवासी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित गोंडी-माडिया शब्दकोश संकलन या सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे सहा.प्राध्यापक डॉ. नरेश मडावी, आदिवासी अध्यासन केंद्राचे डॉ. वैभव मसराम, समन्वयक श्री शुभ्रांशू चौधरी यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रिय कार्यशाळेला छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश सह अन्य राज्यातील प्रमूख प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, देशातील अनेक भागात गोंड राजांनी राज्य केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भागातील आदिवासी महापुरुषांचा सहभाग आढळून येतो. ज्याप्रमाणे देशात राज्य करणाऱ्या अनेक राजांनी आपल्या बोली भाषा लिखित स्वरूपामध्ये टिकवून ठेवल्या. व पुढे त्या त्या राज्यांच्या भाषा लिखीत स्वरुपात आल्या. तसे आपल्या गोंडी भाषेला लिखित स्वरूपामध्ये टिकवून ठेवता आले नाही. त्यामूळे आज गोंडी-माडिया भाषेला जिवंत ठेवण्यासाठी या कार्यशाळांची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या या आदिवासी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित गोंडी-माडिया शब्दकोश संकलन या सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला अतीशय महत्त्व आहे. त्याकरिता या आयोजनाबद्दल त्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले.