दि. 11.01.2024
Gadchiroli News : शिवनगर झोपडपट्टीत हायमास्ट सोलर दिवे लागणार.!
- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रयत्नाला यश.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावर वसलेल्या शिवनगर झोपडपट्टीत हायमास्ट सोलर दिवे लवकरच लावण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी आज अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व झोपडपट्टी वासीयांच्या शिष्टमंडळाला दिले. या आश्वासनामुळे रिपब्लिकन पक्षाच्या मागील अनेक दिवसांपासून झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
शिवनगर झोपडपट्टीत मागील 14 -15 वर्षापासून गोरगरीब व दारिद्र रेषेखालील लोक लहान लहान झोपड्या बांधून राहत असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु या झोपडपट्टीत रस्ते, नाल्या, वीज, पिण्याचे पाणी इत्यादी मूलभूत सुविधा नसल्यामुळे तेथील नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागील अनेक दिवसापासून करण्यात येत आहे.
आज सुद्धा या सर्व समस्या घेऊन पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी श्री पिदूरकर यांची भेट घेतली व या समस्यांबाबतचे लेखी निवेदन त्यांना सादर करून सविस्तर चर्चा केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकाऱ्यांनी शिवनगर झोपडपट्टीत त्वरित हायमास्ट सोलर दिवे लावण्याचे आश्वासन दिले व तसे निर्देश सुद्धा संबंधित अभियंत्याला दिले.
अन्य सुविधांबाबतही लवकरच कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले व त्यासंबंधीच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, झोपडपट्टी चे पदाधिकारी नरेश वाळके, सुखदेव बावणे, अविनाश आत्राम, मनोज आलम, भाऊराव थोरात, गीता कोडाप, ललिता हर्षे, भारती कोडापे, कविता डोक, मीना मेश्राम, निर्मला अर्जुनकार, सुहानी मेश्राम, कल्पना टेकाम, मंगला मेश्राम, गीता टेकाम, शोभा कोलते, लता टेकाम व अन्य झोपडपट्टी निवासी उपस्थित होते.