दि. 18.01.2024
Vidarbha News India
SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाच्या परीक्षेत महत्त्वाचा बदल.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
याआधी १० वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि शाळेच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमआर गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र आता हे गुण परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. परीक्षा मंडळाने यावर्षीपासून हा महत्वाचा बदल केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य परीक्षा बोर्डाच्या वेबसाईटवर एक परिपत्रक प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मू्ल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. यामध्ये मेकर आणि चेकरचा समावेश केला असून शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.
नव्या परीक्षा पद्धतीनुसार परीक्षा बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचा मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. शाळेमधून एक किंवा अधिक वापरकर्ते तयार करणे आवश्यक आहे. यानंतर, वापरकर्त्याला आपल्या विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहेत. ऑनलाइन गुण भरल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य याची तपासणी करणार आहेत.