दि. 06 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India
गडचिरोली : १३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लिपिकास अटक.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/कुरखेडा : आदिवासी व्यक्तीस जमीन विकण्याची परवानगी दिल्याचा मोबदला म्हणून एका व्यक्तीकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (ता.५) संध्याकाळी कुरखेडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नागसेन प्रेमदास वैद्य (वय ४६), यास रंगेहाथ पकडून अटक केली.
या विषयी अधिक माहिती अशी की, एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता व्यक्ती आदिवासी असून, त्याला दुसऱ्या आदिवासी व्यक्तीस जमीन विकावयाची होती. यासाठी त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज केला. त्यानंतर परवानगीही मिळाली. मात्र, परवानगी दिल्याचा मोबादला म्हणून वरिष्ठ लिपिक नागसेन वैद्य याने संबंधित व्यक्तीला १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो १३ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी सापळा लावला. यावेळी वरिष्ठ लिपिक नागसेन वैद्य यास त्याच्याच कक्षात तक्रारकर्त्याकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. रात्री उशिरा नागसेन वैद्य याच्या देसाईगंज येथील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगिरवार, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफल्ल डोर्लीकर आदींनी ही कारवाई केली.
Gadchiroli : Clerk arrested while accepting bribe of 13 thousand rupees.