दि. 22.02.2024
शासन योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे न करणाऱ्यांची गय करणार नाही; - आ. डॉ. देवराव होळी
- पंचायत समिती चामोर्शीच्या वार्षिक आमसभेत आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : पाणीपुरवठा,जलजीवन मिशन, घरकुल, निराधार लाभार्थ्यांच्या योजना, कृषी कनेक्शन, बस स्थानकाची क्रिडांगणाची जागा इत्यादी विषयांना घेऊन धरले धारेवर..
केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणकारी योजना राबवित असून त्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने अनेक लोकांना अजूनही त्या योजनांचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहाचावा यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे असे निर्देश देत जे अधिकारी शासन योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणार नाही त्यांची आपण कोणत्याही परिस्थितीत गय करणार नाही असा इशारा आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी पंचायत समितीच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभेच्या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
याप्रसंगी मंचावर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पाटील साहेब, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख,बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, ओबीसी आघाडी महामंत्री मधुकर भांडेकर, माजी सरपंच अनिता रॉय, यांचे सह पंचायत समितीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे याकरिता जलजीवन मिशन योग्य प्रकारे राबवण्याचे निर्देश दिले. घरकुल योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना गरजूंना मिळावा यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची आवश्यकता असून वास्तविक गरीब असणाऱ्या लोकांना त्या योजनेतून लाभ मिळवून द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. निराधार योजनांचे उशिराने होत असलेले मानधन या संदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागील अनेक कालावधीपासून कृषी कनेक्शन साठी डिमांड भरूनही कनेक्शन देण्यात न आल्याने त्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बसस्थानकाच्या जागेचा प्रश्न क्रीडांगण जागेचा प्रश्न तातडीने मिटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी केल्या.