दि. 25.02.2024
Vidarbha News India
Gadchiroli : मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार.!
Markandeshwar temple :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराची पुनर्बांधणीच्या नावावर तेथील दगडांची उकल करण्यात आली होती. याला एक दशकाचा काळ उलटला असतानाही प्रशासन व पुरातन विभागाने काना डोळा केला.
या मंदिराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याची मागणी घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली येथे उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाच्या या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध मंदिराच्या दुरावस्थेला जबाबदार लोकप्रतिनिधी, प्रशासन व पुरातत्व विभागाला खडे बोल सुनावले होते. आज उपोषणाच्या नवव्या दिवशी पुरातत्त्व विभागाने येत्या 1 मार्चपासून मंदिराचे पूर्वरत बांधकाम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणकर्ते संत मुरलीधर महाराज व प्रशासन यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता केली.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे गेल्या हजारो वर्षांपूर्वीचे पुरातन काळातील हेमाडपंथी शिव मंदिर आहे. जशी काशी येथे गंगा नदी उत्तर वाहिनी होते. तशीच मार्कंड येथे वैनगंगा नदी ही उत्तर वाहिनी होते. त्यामुळे या सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भाविक येतात. दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे प्रचंड मोठी यात्राही भरते. मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षांपूपासून येथील जीर्णोद्वारोच काम प्रलंबित आहे. पुरातन हेमाडपंथी मंदिराची पुनर्बांधणी करणे नियोजनार्थं स्थानिक लोकप्रतिनिधी व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोठा गाजावाजा करून या मंदिराची दगडे उकलून अर्धवट काम केले.
त्यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी 16 फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथे जन आंदोलन करून मार्कंड देवस्थान येथे साखळी उपोषण सुरू केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंदिराच्या दुरावस्याथेबाबत गंभीर दखल घेऊन प्रशासनाला व पुरातत्त्व विभागाला प्रसिद्धी मध्यामातून सज्जड इशारा दिला होता. आज उपोषणाच्या नवव्या दिवशी विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी असता स्थानिक तहसीलदार प्रशांत घरुडे, पोलिस निरीक्षक, जन आंदोलन व उपोषण समितीचे पदाधिकारी यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून उपोषणाचे गांभीर्य पटवून दिले. त्यानंतर पुरातत्व विभागाने महसूल विभागाकरवी उपोषणकर्ते मुरलीधर महाराज यांना लेखी पत्र देऊन येत्या 1 मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल, असे सांगीतले. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते निंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे अनुसुचित जमातीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, हसनअल्ली गिलानी, अजय कांकडालवार, डॉ. चंदाताई कोडवते, कवडूजी कुंदावार, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यासह कार्यकर्ते, उपोषण समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आश्वासन पाळा, अन्यथा मोठे आंदोलन
मंदिराची पुनर्बांधणीचा गाजावाजा करत मार्कंडेश्वर मंदिराची दुरावस्था करण्यात आली. याला एक दशकाचा काळ लोटला असून एका संताला मंदिराच्या दुरुस्तीसाठी उपोषणाला बसावे लागले. ही फार मोठी खेदाची बाब आहे. तर देशाच्या ईतर मंदिरासाठी कोट्यावधींचा खर्च करणार्या सरकारने या मार्कंडेश्वर मंदिराला निधी दिला पाहिजे. पुरातत्त्व विभागाच्या वतीने महसूल प्रशासन लेखी आश्वासन देत येत्या 1 मार्च पासून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे दिलेल्या तारखेस काम सुरू न झाल्यास मुरलीधर महाराज यांच्या सोबत प्रचंड भाविक व नागरिकांच्या उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
...तर मंदिरात उपोषणास बसणार
प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शब्दावर मी अन्नत्याग उपोषण मागे घेत आहे. प्रशासनाने मंदिर बांधकामास दिरंगाई केल्यास चक्क मंदिरातच उपोषणास बसणार, असे संत मुरलीधर महाराज यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले.