दि. 24 मार्च 2024
Vidarbha News India
गडचिरोली चिमूर क्षेत्रातून महाविकास आघाडीचे तिकीट डॉ. नामदेव किरसाण यांना.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : काँग्रेस पक्षाने शनिवार (दि.२३) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. नामदेव किरसान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
एमए, एमकॉम, पीएचडी, एलएलएम अशा पदव्या मिळविणारे डॉ. किरसान हे काही वर्षे नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करुन उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक आणि त्यानंतर उपायुक्त झाले. उपायुक्त म्हणून १८ वर्षे नोकरी केल्यानंतर २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. पुढे त्यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढला. काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट दिले आहे. डॉ. किरसान यांच्यासह माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही जोरदार फिल्डींग लावली होती.परंतु डॉ. उसेंडी यांचा मागील दोन निवडणुकीत पराभव झाल्याचा अनुभव लक्षात घेता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही.
Lok Sabha Election 2024 | महायुतीचे अद्याप ठरेना
अनेक निवडणुकांमध्ये सर्वप्रथम उमेदवारांची घोषणा करणाऱ्या भाजपचे घोडे यावेळी महायुतीतील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे अडले आहे. भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते, आ. डॉ.देवराव होळी, डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न् व् औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हेही निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. सर्व उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने महायुतीच्या नेत्यांपुढे तिकिटावरुन पेच निर्माण झाला आहे.
अशातच २६ मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गडचिरोलीत येणार आहेत. तोपर्यंत उमेदवाराची घोषणा होऊ शकते किंवा त्याच दिवशी बंद लिफाफा उघडून ते उमेदवाराचे नाव जाहीर करतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. एकापेक्षा अनेक तगडे उमेदवार महायुतीकडे असल्याने उर्वरित नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी फडणवीस आणि बावनकुळे यांना गडचिरोलीत यावे लागत असल्याचीही चर्चा आहे.