भाजपकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर! पण यांना आव्हान देणार कोण.? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

भाजपकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर! पण यांना आव्हान देणार कोण.?

दि. 14 मार्च 2024

Vidarbha News India 

भाजपकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर! पण यांना आव्हान देणार कोण.? 

Nitin Gadkari Nagpur Loksabha Constituency :

विदर्भ न्यूज इंडिया 

प्रतिनिधी/नागपूर : भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी जाहीर केली असून, आता त्यांच्या विरुद्ध काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे गडकरी यांची ही सलग तिसरी लोकसभेची निवडणूक असून, त्यांना हॅटट्रिक साधण्याची संधी आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचा समावेश नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मोदी-शहा यांच्या धक्कातंत्राच्या राजकारणामुळे वेगवेगळ्या चर्चाही सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांनी गडकरींना थेट त्यांच्या शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. काँग्रेसनेही टीकेची संधी सोडली नव्हती. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गडकरी यांचे नाव जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

पहिल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्क्यांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मुत्तेमवार यांनी नागपूरमधून उमेदवारीच मागितली नाही. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते.

त्यांचाही सुमारे सव्वा दोन लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव झाला. पटोले यांनी यावेळी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा नवा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या बैठकीत आमदार अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांच्या नावावर चर्चा झाली. यात वंजारी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

निवडणूक २०१४

नितीन गडकरी (भाजप)

५ लाख ८७ हजार ७६७

विलास मुत्तेमवार (काँग्रेस)

३ लाख २ हजार ९१९

निवडणूक २०१९

नितीन गडकरी (भाजप)

६ लाख ६० हजार २२१

नाना पटोले (काँग्रेस)

४ लाख ४४ हजार २१२

भाजप आधीच ५१ टक्क्यांपुढे

भाजपची सर्वत्र ५१ टक्के मते घेण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, नितीन गडकरी यांनी सरासरी ५५.६१ टक्के मते घेऊन यापूर्वीच भाजपला ५१ टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवले आहे. मात्र, मुत्तेमवारांच्या तुलनेत पटोले यांच्या विरुद्ध गडकरी यांचे मताधिक्य सुमारे ७० हजार मतांनी घटले होते. पटोले लढले तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष नव्हते. ते नागपूरचेसुद्धा नाहीत. असे असताना त्यांना साडेचार लाखांच्या जवळपास मते मिळाली होती. ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे.


दहा वर्षांपासून शहराच्या विकासासाठीच प्रयत्न : गडकरी

नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यावर नितीन गडकरी यांनी सोशल माध्यमांतून त्यांची भावना व्यक्त केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने माझ्यावर परत विश्वास दाखविला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जे.पी.नड्डा व निवडणूक समितीचे धन्यवाद. मागील १० वर्षांपासून मी नागपूरच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. जनतेच्या प्रेम व समर्थनातून हे काम पुढेदेखील सुरू ठेवेन, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.(Latest Marathi News)


Share News

copylock

Post Top Ad

-->