दि. 20 मार्च 2024
Vidarbha News India
Gadchiroli : 36 लाख रुपये बक्षिस असणाऱ्या चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान.!
Police Encountered 4 Naxalite in Gadchiroli
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोलामर्का पहाडी परीसरातील जंगलात झालेल्या भीषण चकमकीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे.
ही चकमक मंगळवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास झाली. चकमक झालेले घटनास्थळ महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील जंगलात आहे. या चारही मृत माओवाद्यांवर महाराष्ट्र सरकारने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य शनिवार (ता. १६) नंतर तेलंगणातून प्राणहिता नदी पार करून गडचिरोत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस मंगळवारी पहाटे जिमलगट्टा उपविभागाअंतर्गत रेपनपल्ली उप पोलिस स्टेशनपासून दक्षिण-पूर्वेला ५ किमी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात शोध सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.
यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र माओवाद्यांनी उलट पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध घेतला असता घटनास्थळावर ४ पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एके ४७ रायफल, एक कार्बाइन रायफल, दोन देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुसे व स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत केले.
हे अभियान विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूरचे संदीप पाटील, पोलिस उप महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) जगदीश मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश व पोलिस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
मृत नक्षलींवर ३६ लाखांचे बक्षीस
मृत माओवाद्यांची नावे वर्गिस (वय २८), पोडीयम पांडू उर्फ मंगटू (वय ३२), कुरसंग राजू, कुडीमेट्टा व्यंकटेश अशी असून या चौघांवरही महाराष्ट्र शासनाने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षली दलममध्ये वर्गिस हा मांगी इंद्रावेली क्षेत्र समिती सचिव तथा कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती सदस्य, तर मंगटू सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती सचिव होता. दोघेही दलममध्ये विभागीय कमिटी सदस्य पदावर असून ते छत्तीसगमधील विजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अन्य दोन मृत नक्षली राजू व व्यंकटेश हे प्लाटून सदस्य आहेत.