दि. 15.05.2024
Vidarbha News India
गडचिरोली : तेंदुपत्ता तोडत असलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गडचिरोली : शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात तेंदुपत्ता तोडत असलेली एक ६४ वर्षीय वृद्ध महिला ठार झाली.
ही घटना मंगळवार (ता. १४) सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली असून मृत महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल (वय ६४) रा. आंबेशिवणी, असे आहे.
जिल्हाभरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असून जवळपास एक आठवडा चालणाऱ्या या तेंदूपत्ता संकलनासाठी हजारो मजूर, शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगल परिसरामध्ये तेंदुपत्ता संकलन करत असतात. या तेदुपत्ता संकलनावर त्यांचा वर्षभराचा बजेट अवलंबून असतो. मृत पार्वता पाल गावातील काही नागरिकांसह तेंदूपत्ता संकलन करत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले.
गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिस पाटील भैसारे यांनी गडचिरोली वनविभागाला दिली. चातगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी पडवे यांनी आपल्या चमुसह आंबेशिवणी येथील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेडगे यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे . पार्वता पाल यांच्या पश्चात पती, मुलगा , सुन, नातवंडे व बराच मोठा आप्त परीवार आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करून मृताच्या कुटूंबाला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Gadchiroli: A woman who was cutting tendu leaves was killed in a tiger attack.