राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी, 13 मतदार संघात होणार झुंज.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी, 13 मतदार संघात होणार झुंज.!

दि. 19.05.2024
Vidarbha News India 
राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी, 13 मतदार संघात होणार झुंज.!
विदर्भ न्यूज इंडिया 
मुबंई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराला शनिवारी पूर्णविराम मिळाला. मुंबईतील सहा जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 लोकसभा मतदारसंघांत सोमवार, 20 मे रोजी मतदान होणार आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने राजकीय तापमानसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी संपला असला, तरी आता पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला गती येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.

'मविआ'कडून भाजपवर हल्लाबोल

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी पवार गटाच्या शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला. त्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघात रोड शो केला. मुंबईत रोड शो तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबईत सभा घेतल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. या प्रचाराची सांगता उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदिरात दर्शनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

दुसरीकडे, महायुतीनेही अखेरच्या दिवशी मुंबई महानगरात प्रचाराचा धुराळा उडवून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या जाहीर सभेनंतर शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत प्रचार सभा घेतली. तसेच, रॅलीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही पत्रकार परिषदा आणि मेळावे घेत प्रचार केला.

भाजपची संपूर्ण यंत्रणा प्रचारात

भाजपने महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. देशभरातील पाच मुख्यमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, विदेशमंत्र्यांसह अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांनी आतापर्यंत प्रचारात सहभाग घेतला. याशिवाय, तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई, हैदराबादेत ओवैसींविरोधात निवडणूक लढविणार्‍या माधवी लता, अभिनेत्री रूपा गांगुली आदींनी मुंबईत प्रचारासाठी तळ ठोकला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईत जोरदार प्रचार केला. राज यांनी शनिवारी भांडुप आणि विक्रोळीतील सर्व शाखांना भेट देत महायुतीसाठी प्रचार केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा-भाईंदर येथे रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी दाखल झाले. ठाण्यातील प्रचार आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मतदारसंघांकडे कूच केली. मुंबईत त्यांनी सर्वप्रथम दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेत सहभाग नोंदविला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळीच ठाणे गाठले. फडणवीस यांनी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ वागळे इस्टेट येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभाग नोंदविला. त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन करताना मतांसाठी आवाहन केले.

राज्यातील 13 मतदारसंघांत होणार कडवी झुंज

मुंबई उत्तर : पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
मुंबई उत्तर पश्चिम : अमोल कीर्तिकर (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) वि. रवींद्र वायकर (शिवसेना-एकनाथ शिंदे)
मुंबई उत्तर पूर्व : मिहिर कोटेचा (भाजप) वि. संजय दिना पाटील (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई उत्तर मध्य : उज्ज्वल निकम (भाजप) वि. वर्षा गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे) वि. यामिनी जाधव (शिवसेना-शिंदे)
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना-शिंदे) वि. अनिल देसाई (शिवसेना-ठाकरे)
नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना-एकनाथ शिंदे) वि. राजाभाऊ वाजे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धुळे : शोभा बच्छाव (काँग्रेस) वि. सुभाष भामरे (भाजप)
दिंडोरी : भारती पवार (भाजप) वि. भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
पालघर : हेमंत विष्णू सावरा (भाजप) वि. भारती कामडी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ठाणे : राजन विचारे (शिवसेना-ठाकरे) वि. नरेश म्हस्के (शिवसेना-शिंदे)
कल्याण : डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना-शिंदे) वि. वैशाली दरेकर (शिवसेना-ठाकरे)
भिवंडी : कपिल पाटील (भाजप) वि. सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)


Share News

copylock

Post Top Ad

-->