दि.13.05.2024
Vidarbha News India
बस स्थानक बनले खाजगी वाहनांचा अड्डा, सर्वत्र घाण व दुर्गंध; प्रशासनाचे दुर्लक्ष.!
- पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/उमरेड : सिर्सी येथील बस स्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहनांची दिवसभर गर्दी राहत असल्याने एसटीच्या चालकांना नाईलाजाने बस रस्त्यावर उभी करावी लागते. त्यामुळे वाहतूकिला अडथडा निर्माण होऊन मोठी दुर्घटना होण्याचा धोका सतत लागून असतो.
सिर्सी हे उमरेड तालुक्यातील उमरेड - हिंगनघाट रोड वरील मोठी बाजार पेठ असलेले गाव आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असल्याने या मार्गावर वाहनांची दिवसभर मोठी गर्दी असते. ये जा करणाऱ्या प्रवशांसाठी गावात बस स्थानक आहे. परंतु सध्या हे बस स्थानक खाजगी प्रवासी वाहतूकदारांचा अड्डा बनलेले दिसून येते. रेती गिट्टीचे टिप्पर, प्रवासी वाहतूक करणारे काळी - पिवळी, डुक्कर ऑटो इत्यादी वाहने बस स्थानक परिसरात उभी करण्यात येतात. एसटी बस उभी करायला जागा मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने बस चालकास रस्त्यावर बस उभी करुन प्रवासी बसवावे व उतरवावे लागते. बस स्थानक परिसरापर्यंत एसटी पोहचत नसल्याने प्रवासी सुद्धा रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट बघत असतात. रस्त्याच्या कडेला उभी राहणारी एसटी, भरधाव जाणारी वाहने, मध्येच जाम होणारी वाहतूक यामुळे अपघाताचा धोका नेहमीच लागून असतो. प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच या परिसरात वावरावे लागते.
----> ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
परिसरातील व्यापारी, व्यवसायिक त्यांच्या दुकानातील कचरा बस स्थानक परिसरात आणून टाकतात त्यामुळे या परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप आल्याचे दिसून येते. सर्वत्र पसरलेली घाण व दुर्गंधी यामुळेही बस स्थानकात प्रवासी जाणे टाळतात. वरील बाबींकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.
----> पोलीस करतात तरी काय ?
बस स्थानक परिसरातून चालणारी अवैध प्रवासी वाहने, त्यांनी बस स्थानकावर केलेला कब्जा, रस्त्याने वेगात धावणारे ट्रक टिप्पर याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर पोलीस वरील बाबींकडे गांभीर्याने बघणार काय ? असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
----> वेग प्रतिबंधकाची मागणी
गावातून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या गतीला ब्रेक लावण्यासाठी गावातील रस्त्यावर वेग प्रतिबंधक बनविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.