दि. 22 जून 2024
Vidarbha News India
विदर्भात पावसाची दमदार हजेरी; मॉन्सून पुन्हा सक्रीय.!
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : तीन-चार दिवस ओढ दिल्यानंतर विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावून नागपूरकरांना सुखद धक्का दिला. ग्रामीण भागांतही दमदार पाऊस बरसल्याने बळीराजाही सुखावला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी तीन-चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
गेल्या सोमवारी धो-धो बरसल्यानंतर वरुणराजा अचानक गायब झाला होता. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. आज पावसाने सर्वत्र हजेरी लावली. सुरुवातीला चारच्या सुमारास काही भागांत जोरदार बरसल्यानंतर सायंकाळी पुन्हा मेघगर्जनेसह हजेरी लावली. मॉन्सूनने सध्या संपूर्ण विदर्भ व्यापला असून, मध्यप्रदेशच्या दिशेने सरकला आहे.
पावसाची दमदार हजेरी
अनुकूल वातावरणामुळे वेगाने पुढे वाटचाल सुरू केली आहे. त्याचा प्रभाव उपराजधानीत प्रकर्षाने दिसून आला. दुपारी तीनपर्यंत ऊन तापल्यानंतर अचानक आभाळ भरून आले. विशेषतः उत्तर व पश्चिम नागपुरातील सिव्हिल लाइन्स, सदर, मानकापूर, काटोल रोड, गोधनी व झिंगाबाई टाकळी या भागांमध्ये जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला. सहानंतर पुन्हा सगळीकडे हलक्या मॉन्सून सरी बरसल्या. पावसामुळे वातावरण गारेगार व आल्हाददायक झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.
जोरदार पावसासाठी सध्या अनुकूल वातावरण असल्याने व हवामान विभागाचा चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे आगामी काळात नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा दमदार पावसाची दाट शक्यता आहे. गडचिरोली व बुलडाणासह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. उशिरा का होईना मॉन्सून सक्रीय झाल्याने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांना आता वेग येणार आहे.