दि. १५ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
नागपूर : पतंगांनी व्यापले आकाश; शहरातील १२ उड्डाणपूल बंद ..!
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : रविवारी आलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नागपुरात पतंग शौकीनांच्या आनंदाला उधाण आले आहे. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश व्यापले असून सर्वत्र ओ.. .पार…ओ काsssट…च्या आरोळ्या घुमत आहेत.
नायलॉन मांजाचा सर्रास वापर
प्रतिबंधित नायलॉन मांजाला सर्वच स्तरातून विरोध झाला. शाळकरी मुलांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथही घेतली. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेतल्याचा दावा केला. आज मात्र स्थिती काही वेगळीच दिसली. पोलिसांनी अगदी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार असल्याचेही सांगितले होते. पण, या साऱ्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. अगदी बिनधास्तपणे शहराच्या सर्वच भागात नायलॉन मांजानेच पतंग उडविला जात असल्याचे चित्र होते. आनंदाच्या या पर्वादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक नागरिक सतर्क होते. मांजा दिसेल तेथे त्याच्या वापरावर विरोध करण्यावर भर दिल्याचेही दिसले.
१२ उड्डाणपूल बंद
नायलॉन मांजाचा सर्वाधिक धोका दुचाकी चालकांना होतो. त्यातही उड्डाणपुलांवर सर्वाधिक भीती असते. ही बाब लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील उड्डाणपूल आज (दि. १५) सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी वैद्यकीय व्यवस्ठा अलर्टवर
दरम्यान, मांजामुळे आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी मेडिकल, मेयोत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आकस्मात विभाग, अस्थिव्यंग आणि सर्जरी विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागचे प्रमुख व अधिनस्थ डॉक्टरांनाही तत्परतेने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.