गडचिरोली : आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही सूरजागड टेकडीवर आणखी ६ लोहखाणी सुरू होणार... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही सूरजागड टेकडीवर आणखी ६ लोहखाणी सुरू होणार...

दि. ०९ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

गडचिरोली : आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही सूरजागड टेकडीवर आणखी ६ लोहखाणी सुरू होणार; खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे

विदर्भ न्यूज इंडिया

प्रतिनिधी/ गडचिरोली : स्थानिक आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यात प्रशासनाला यश आले. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, याच टेकडीवर पुन्हा ६ नव्या खाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

त्यासाठी नुकतेच निविदा मागवण्यात आल्याने पुन्हा एकदा खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला दोन दशके वाट पाहावी लागली. सूरजागड टेकडीवर आदिवासींचे पारंपरिक ठाकूर देव, संरक्षित माडिया जमात आणि जंगल खाणीमुळे नष्ट होतील, अशी भीती येथील आदिवासींच्या मनात आहे. मात्र, दीडवर्षापूर्वी प्रशासन व कंत्राटदार कंपनीने सर्वच पर्यायांचा वापर करून हा विरोध मोडून काढला व विनाअडथळा येथील खाण सुरू केली. वर्षभरात हजारो कोटींचे लोहखनिज बाहेर पाठवण्यात आले.
त्यामुळे या भागातील उर्वरित खाणीदेखील कार्यान्वित करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

नुकतीच खनिकर्म विभागाकडून सूरजागड टेकडीवर ६ खाणींसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहे. यात देवलमारी येथील चुनखडक खाणीचा देखील समावेश आहे. मात्र, नेमके ठिकाण यात स्पष्ट नाही. सद्यस्थितीत सूरजागड टेकडीवर ३४८ हेक्टर जागेवर उत्खनन सुरू आहे. नुकतेच येथील उत्खनन क्षमता ३० लाख टनांवरून १ कोटी टन इतकी वाढविण्यासंदर्भात प्रभावित क्षेत्र वगळून जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली. या प्रक्रियेवरदेखील स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. आता खाणींची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे, हा परिसर मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या विळख्यात सापडू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रभावित क्षेत्रात वाढ होण्याची भीती

वर्तमान परिस्थितीत सुरू असलेल्या उत्खनन व शेकडो अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ६० किमीचा परिसर धुळ आणि खराब रस्त्यांमुळे अडचणीत सापडला आहे. लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. यामुळे अधूनमधून स्थानिक विरोध करत असतात. खाणीजवळील काही गावांवर विस्थापनाचे संकट घोंगावत आहे. अशा स्थितीत पुन्हा याठिकाणी ६ खाणी सुरू केल्यास हे संकट अधिक वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे, येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->