दि.२४.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
गडचिरोली पोलिसांकडून जहाल नक्षलवाद्यास अटक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या ‘टीसीओसी’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी एका जहाल नक्षल्यास अटक केली आहे. वेल्ला केसे वेलादी( वय ३५ रा.येडापल्ली,छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’) साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत येल्ला वेलादी या नक्षल्यास अटक करण्यात यश आले.
तो २००१ मध्ये जनमिलीशियामध्ये सहभागी झाला. त्यानंतर २००६ मध्ये तो सेंड्रा दलमचा सदस्य झाला. सप्टेंबर २०२१ झालेल्या मडवेली चकमकीत त्याचा सहभाग होता. २३ डिसेंबर २०२२ रोजी टेकामेटा येथे झालेल्या चकमकीत डीव्हीसी भास्कर यास पळून जाण्यात वेल्ला वेलादी याने मदत केली, असा त्याच्यावर आरोप आहे. चकमक, जाळपोळ, दरोडा, खुनाचा प्रयत्न करणे आदी प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, मडवेली चकमकीतील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.