दि. १५.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
22 हजारांवर तेंदू मजूरांचे जीवनमान उंचावणार; तेंदू हंगामात 11.80 कोटी रुपयाचा महसुल मिळाला
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : तेंदूपान संकलनातून जमा होणारे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदू पान संकलन करणार्या मजूरांना (Laborers) प्रोत्साहनात्मक मजूरी म्हणून वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
याअंतर्गत सन 2022 च्या हंगामामध्ये तेंदू संकलनातून प्राप्त महसूलाची रक्कम तेंदूपान संकलन करणार्या तब्बल 22 हजार 327 कुटूंब प्रमुखांना वाटप करण्यात येणार आहे. यामुळे उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या जिल्ह्यातील तेंदू मजूरांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
तेंदू पाने संकलनाकरिता लिलाव प्रक्रियेतून मिळणार्या स्वामित्व शुल्कातून विविध खर्च वजा करुन त्या हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्साहन मजूरी (Laborers) ठरविण्यात येते. मात्र आता सन 2022 च्या हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजावट न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणार्या मजूरांना प्रोत्साहनात्मक मजूरी म्हणून देण्यात येणार आहे. यासंदर्भाचा महत्वूपूर्ण निर्णय 31 जानेवारी 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तेंदु संकलनाचा कालावधी फक्त एक महिन्याचा असताना प्रशासकीय खर्च संपुर्ण वर्षासाठी वजा करणे, वन विभागास तेंदु विक्रीतुन कमी दर मिळण्याबाबत स्थानिकांमध्ये निर्माण होणारी नाराजी, तेंदु संकलनकर्त्यांना एक वर्ष उशिराने प्रोत्साहन मजुरी मिळणे आदी नकारात्मक बाबीवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे.
मागील तीन वर्षात 33 कोटी रूपये इतका प्रशासकीय खर्च दरवर्षी तेंदुपाने संकलनाकरीता होत आहे. तथापी उपरोक्त मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदुपाने संकलनाद्वारे जमा होणार्या संपुर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची प्रशासकीय खर्चाची वजाती न करता प्रोत्साहनात्मक मजुरीची (Laborers) रक्कम वन विभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदु संकलनकर्त्यांना अदा करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या या मान्यतेमुळे उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लाखो तेंदू मजूरांच्या उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान सुधारणार आहे.
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली, गडचिरोली, वडसा या तीन वनविभागात सन 2022 च्या तेंदू हंगामात 11.80 कोटी रुपयाचा महसुल मिळालेला असून सदर संपुर्ण महसुल तीनही वनविभागात तेंदूपाने संकलन करणार्या कुटूंब प्रमुखांना दिला जाणार आहे. या आर्थिक लाभामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
- डॉ. किशोर एस. मानकर (वनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली)