दि. २८.०४.२०२३
नवीन शैक्षणिक धोरणानुसार संधीचे सोने करा;
डॉ. चंद्रमौली यांचे प्रतिपादन
Vidarbha News India
- मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता डॉ. ए.एस चंद्रमौली
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या अत्यंत हिताचे आहे. ह्यानुसार विद्यार्थ्यांना विविध विषय शिकता येतील व आपला सर्वांगीण विकास करता येतो व उपयुक्त रोजगार किंवा नोकरी सहज मिळविता येते. त्यामुळे ह्या नवीन संधीचे सोने करावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या मानवविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एस. चंद्रमौली ह्यांनी केले.
स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे विद्यापीठ स्तरीय ' नवीन शैक्षणिक धोरण २०२० ' ह्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यु. टिपले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख डॉ. आर. एन. कुबडे, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. एन. टी. खोब्रागडे व प्रा. एच. के. राजूरकर हेउपस्थित होते. महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेता येईल.
ह्या धोरणामुळे प्रथम वर्ष पूर्ण करणाऱ्याला प्रमाणपत्र, दोन वर्ष पूर्ण करणाऱ्याला डिप्लोमा तर तीन वर्ष पूर्ण करणाऱ्याला पदवी मिळेल असे डॉ. ए. एस. चंद्रमौली म्हणाले. पीपीटी च्या माध्यमातून त्यांनी नवीन विषय विद्यार्थ्यांना अगदी सुलभ भाषेत समजावून सांगितला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले म्हणाले की, ह्या धोरणानुसार विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होईल. जो अर्ध्यातून शिक्षण सोडून जाईल त्याला प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा मिळेलच.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. कुबडे ह्यांनी केले संचालन डॉ. आर. डब्लू. सुर ह्यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.दया मेश्राम ह्यांनी मानले.पिपी टी सादरीकरणासाठी महाविद्यालयीन कर्मचारी होशांत वासेकर ह्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.