दि. २७.०४.२०२३
Vidarbha News India
Government Scheme : पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना मिळणार योजनांचा लाभ
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : शेवटच्या गरजूपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी 'शासकीय योजनांची जत्रा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियानांतर्गत 'शासकीय योजनांची जत्रा' या कार्यक्रमाबाबत सोमवारी (ता. २४) आयोजित बैठकीत वडदकर हे बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे आणि विकास आवटे यांची उपस्थिती होती.
वडदकर म्हणाले, की राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती जनतेला देत त्याचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी 'शासकीय योजनांची जत्रा' हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
त्यानुसार परभणी जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 'शासकीय योजनांची जत्रा' उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहचला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय, नियोजन करून, प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांचा आराखडा तयार करावा.
वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे.यावेळी शासकीय योजनांची जत्रा' या कार्यक्रमाची रूपरेषा, जबाबदारी व टप्पे याची उपस्थित अधिकाऱ्यांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमांची योग्य व नियोजनबद्ध अंमलबजावणी व नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांतील अधिकारी यांची उपस्थिती होती.
