दि. ३०.०५.२०२३
Vidarbha News India
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज इंडिया
महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले अस...
महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले असून त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा जिल्हा कार्यालयाच्या, महाव्यवस्थापक लीना कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
13 जानेवारी, 2021 रोजी 1 लाख सौर कृषिपंप व दि. 30 ऑगस्ट, 2022 रोजी पुढील 1 लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली. राज्य शासनाकडून 12 मे, 2021 रोजी राज्यात सदर योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.
महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार असून योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट ,फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 / 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.