दि. ३०.०५.२०२३
Vidarbha News India
तब्बल साडेसहा किलो गांजा जप्त; गडचिरोली पोलिसांची उल्लेखनीय कारवाई
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : तब्बल साडेसहा किलोचा गांजा जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. एकूण ७,१९,६९० रुपये किमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.
याबाबत गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी वरिष्ठांच्या परवानगीने रात्रीच्या दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान आशिष धनराज कुळमेथे (वय २८ वर्षे, रा. संजयनगर, जि. चंद्रपूर, धनराज मधुकर मेश्राम (वय ३३ वर्षे, रा. नेहरुनगर, जि. चंद्रपूर, ज्योती श्रीकृष्ण परचाके (वय २२ वर्षे, रा. शास्त्रीनगर, जि. चंद्रपूर) यांच्या ताब्यातील वाहन क्रमांकाची (एम.एच. ३४ बी.आर. ४०८६) पंचांसमक्ष तपासणी केली असता, वाहनाच्या डीकीत एकूण ९९,६९० रुपये किंमतीचा ६.६४६ किलो ग्रॅम गांजा, ६,००,००० रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच २०,००० रुपये किंमतीचे मोबाईल असा एकूण ७,१९,६९० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.
संबंधित अंमली पदार्थ (गांजा), मोबाईल तसेच गांजा वाहतूकीसाठी वापरलेले स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करुन नमूद आरोपींविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत असून, आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने आरोपींचा ३१ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
सदर कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील, पोलीस हवालदार नरेश सहारे, पोलीस हवालदार हेमंत गेडाम, पोलीस नायक सतिश कत्तीवार, पोलीस नायक राकेश सोनटक्के, पोलीस शिपाई उमेश जगदाळे, पोलीस शिपाई सचिन घुबडे, पो शिपाई माणिक दुधबळे, पोलीस हवालदार लक्ष्मी बिश्वास, पोलीस नायक सविता उसेंडी, चापोना माणिक निसार, चापोना मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.