सूरजागड लोह वाहतुकीविरोधात कडकडीत बंद, भरउन्हात धडकला मोर्चा..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सूरजागड लोह वाहतुकीविरोधात कडकडीत बंद, भरउन्हात धडकला मोर्चा..!

दि. १९.०६.२०२३

Vidarbha News India

सूरजागड लोह वाहतुकीविरोधात कडकडीत बंद, भरउन्हात धडकला मोर्चा..!

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाविरोधात तालुका अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने १९ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

व्यापारपेठ कडकडीत बंद ठेऊन निघालेल्या मोर्चात स्थानिकांसह व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी विद्यार्थी संघासह भाजप पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

सूरजागड पहाडीवरील उत्खनन व वाहतुकीमुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिकांनाही याची झळ सोसावी लागत आहे. बेदरकार वाहतूक, त्यातून निष्पाप लोकांचे चाललेले जीव, धूळ, प्रदूषण, रस्त्याकाठच्या पिकांची हानी, रस्त्यांची दयनीय अवस्था अशा अनेक समस्या आहेत. वनवृक्षाची राजरोस कत्तल सुरू आहे. शिवाय लोहखनिजासाठी सातत्याने स्फोट घडविले जात आहेत.

या प्रकल्पामुळे जलस्त्रोत आटू लागले असून पाणीटंचाईचा धोका वाढल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याविरोधात एटापल्ली तालुका अन्याय विरोधी संघर्ष समितीने बंदची हाक दिली होती. त्यास व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. १९ रोजी कडकडीत बंद पाळून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी निवेदन स्वीकारले. उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते. परिसरातील महिला, पुरुष, व्यापारी, आदिवासी विद्यार्थी संघ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

अशा आहेत मागण्या...

लोहवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग करावा, तोपर्यंत रस्त्याने वाहतूक बंद ठेवावी, जलपातळी वाढविण्यासाठी बंधारा बांधावा, सर्वसुविधांयुक्त दवाखाना उभारावा, रॉयल्टीपोटी मिळणाऱ्या ७५ टक्के निधीतून तालुक्यात विकासकामे करावीत, बसेसची संख्या वाढवून दळणवळण सुखकर करावे, आलापल्ली ते चोखेवाडा रस्त्याचे काम करावे, प्रकल्पात स्थानिक ८० टक्के तरुणांना रोजगार द्यावा, जनहितवादी समितीने यापूर्वी केलेल्या ११० दिवसाच्या आंदोलनावेळी लॉयड मेटल्स कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

तर बेमुदत चक्काजाम

या मागण्यांबाबत २० दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास बेमुदत चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार, माजी जि.प. अध्यक्ष व आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजप तालुकाध्यक्ष विजय नल्लावार, तालुका उपाध्यक्ष गणेश खेडेकर आदी उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->