दि. २१.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : गरोदर मातेला नावेने आणले, मात्र प्रसुतीला उशीर असल्याचे कळताच तिने काढला पळ..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याचा फाेन येताच कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील गट प्रवर्तकने पुरातून नावेने प्रवास करत गाव गाठले. तिला रुग्णालयात भरती केले. मात्र, प्रसूती हाेण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी आहे.
हे डाॅक्टरकडून कळताच गराेदर मातेने रुग्णालयातून बुधवारी सायंकाळीच पळ काढल्याची घटना घडली.
अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट रुमालकसा येथून सुशीला श्यामराव मडावी (२७) या गरोदर मातेला बुधवारी प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. गावातील आशा वर्कर मंजुळा सिडाम यांनी या बाबतची माहिती कमलापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फाेनने दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मानकर,डॉ. संतोष नैताम, गटप्रवर्तक विद्यादेवी येजुलवार हे रुग्णवाहिकेने रुमालकसा गावाजवळ पाेहाेचले. मात्र, या गावाला बांडिया नदीच्या पुराने चारही बाजूने वेढले हाेते. अशा परिस्थितीत गटप्रवर्तक विद्यादेवी येजुलवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून छोट्याशा नावेने जलप्रवास करत रुमालकसा गाव गाठले. तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत तिची आरोग्य तपासणी केली असता आरोग्य तपासणीत प्रसूतीला वेळ असल्याचे कळले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे २७ जुलैला तिची प्रसूतीची तारीख आहे. मात्र, रुमालकसा गाव हे अतिदुर्गम भागात वसले आहे. गावाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. अशा परिस्थितीत प्रसूती हाेईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरोदर मातेला दिला. मात्र, गरोदर मातेने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे न ऐकता प्राथमिक आरोग्य केंद्रातून घरी जाण्यासाठी बुधवारी सायंकाळीच पळ काढला. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अनेकदा विनवणी करूनही ती महिला थांबली नाही.
एकीकडे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिला आणि तिच्या बाळाच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून पुराच्या पाण्यातून वाट काढत रुग्णालयात भरती केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला न जुमानता प्राथमिक आरोग्य केंद्रातून पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गरोदर महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रसूतीला वेळ असल्याचे कळताच तिने कर्मचाऱ्यांचे न ऐकता प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघून गेली आहे. आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला योग्य उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला ऐकण्यासाठी तयार नव्हती.
- डॉ. राजेश मानकर, आरोग्य अधिकारी, कमलापूर