दि. १०.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे यावर्षी दुसऱ्या वर्षात पदार्पण
- या निःशुल्क अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : अभ्यासिकेची गरज ही वाचन संस्कृती वाढविणे आणि टिकवण्यासाठी आहे. विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची गरज असते. तसेच वाचन हा संस्कार आहे आणि तो घडवायचा असेल तर अभ्यासिकेची भूमिका अनन्यसाधारण आहे.
याच उद्देशाने गोंडवाना विद्यापीठात सत्र २१-२२ पासून स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला सुरवात करण्यात आली आहे.
गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून गडचिरोली परिसरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची मोफत सुविधा विद्यापीठाने सुरू केली आहे. दुपारी ३ते रात्री ८वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात ही सुविधा उपलब्ध राहील.
बरेच विद्यार्थी आर्थिक अडचणी मुळे अभ्यासिका लावू शकत नाही. अभ्यास, वाचन, चिंतन व मनन अशा बाबी अभ्यासिकेत सहज शक्य होतात. गडचिरोली परिसरात विविध शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोफत अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले आहे.
अभ्यासिकेसाठी नाव नोंदणीला सुरवात
अभ्यासिकेसाठी नाव नोंदणीला सुरवात झाली असून सदर फॉर्म विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अभ्यासिका नोंदणी करता अभ्यासिका समन्वयक तसेच ज्ञान स्रोत केंद्राच्या संचालक डॉ.रजनी वाढई किंवा सहसमन्वक डॉ.एस.व्ही. सुदेवाड भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२४६८१५१ यांच्याशी संपर्क साधावा.