दि. ०४.०८.२०२३
उद्या गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन
- दिग्गज रंगकर्मी लावणार हजेरी; 30 कलावंतांची निवड
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात निशुल्क राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उद्या पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली, लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सहकार्याने ५ ऑगस्ट पासून ४ सप्टेंबरपर्यंत एक महिन्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी चंद्रपूर व गडचिरोली शहरात ऑडीशन घेण्यात आले होते. यामध्ये २०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० गुणी व होतकरू कलावंतांची निवड करण्यात आली. या कलावंतांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा दिल्लीचे तज्ञ, प्राध्यापक व रंगकर्मी अभिनय व थिएटरचे धडे देणार आहेत. त्यानंतर एका महिन्याच्या कार्यशाळेतून 30 विद्यार्थ्यांचे एक नवीन नाटक तयार होणार आहे.
उद्घाटनाला कलावंतांची मंदियाळी...
तीस दिवस चालणाऱ्या या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी, सकाळी १० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, जेष्ठ झाडीपट्टी कलावंत प्रा. डॉ. शेखर डोंगरे, आईस बालाजी इन्स्टिट्यूट मुंबईच्या लक्ष्मी रावत, कार्यशाळेच्या संचालिका संगीता टिपले तसेच कार्यशाळा समन्वयक अनिरुद्ध वनकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेला उपस्थित राहण्याच आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.