दि. १८.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : महिलेचा बळी घेणारी टी १४ वाघीण जेरबंद, देसाईगंज वनक्षेत्रात होती दहशत.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शेतात गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर हल्ला करून बळी घेणाऱ्या टी- १४ वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बचाव पथकाने देसाईगंज वनक्षेत्रात ही कारवाई केली.
देसाईगंज वनपरीक्षेत्रातील फरी येथे ११ सप्टेंबर रोजी महानंदा मोहूर्ले (५१, रा. फरी) या गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कक्ष क्र. ८५३ मध्ये टी- १४ या वाघिणीने हल्ला केला. त्यानंतर ५० मीटर अंतरावर जंगलात फरफटत नेऊन ठार केले होते. यानंतर त्याच रात्री या वाघिणीने शेळीचा फडशा पाडला होता. त्यामुळे उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा लावून ट्रॅप कॅमेरेही लावले होते. वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र- शिवराजपुर मधील कक्ष क्र. ८६६ मध्ये चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी रविवारी सकाळच्या सुमारास डार्ट करून (इंजेक्शन देऊन) वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर चमुच्या सहाय्यान पिंजऱ्यात कैद केले. वनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्रीय कर्मचारी अक्षय दांडेकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
तपासणी करून पाठवले नागपूर व्याघ्रप्रकल्पात
जेरबंद करण्यात आलेल्या टी- १४ वाघिणीचे वय अंदाजे २ वर्षे आहे. सदर वाघिण।णीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.