दि. २ नोव्हेंबर २०२३
Vidarbha News India
घरफोड्यास अखेर बेड्या, ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर.!
विदर्भ न्यूज इंडिया
वर्धा : दिवसा घरफोडी करुन चोरट्याने घरात प्रवेश करुन ५६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना गिरड गावात घडली होती. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने करुन आरोपी चोरट्यास गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावातून अटक केली.
त्याच्याकडून चोरीतील ५६ हजारांपैकी ३७,४०० रुपयांची रक्कम हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
विनोद उर्फ विजेंद्र गोविंद इटनकर(३५) रा. सावंगी (वडगाव) ह. मु. कोरची जि. गडचिरोली. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, राजू रामदास फोफारे रा. सावंगी (वडगाव) यांच्या घरी ठेवलेले ५६ हजार रुपये रोख रक्कम अज्ञाताने चोरुन नेली होती. ती चोरी विनोद नामक व्यक्तीने केल्याचा संशय असल्याने २३ रोजी गिरड पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासचक्रे फिरविली.
गुन्ह्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच समांतर तपास करीत असताना चोरीस गेलेले पैसे हे विनोद इटनकर याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. तांत्रीक तपासान्वये आरोपी चोरटा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात मिळून आला त्यास अटक करुन पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबूली दिली.त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या पैशांपैकी ३७ हजार ४०० रुपयांची रक्कम हस्तगत केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, राजेश तिवस्कर, नरेंद्र पराशर, दिनेश बोथकर, संघसेन कांबळे, नितीन इटकरे, मिथुन जिचकार यांनी केली.