चिमूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य संतापले, सरपंचांसह कर्मचाऱ्याला खोलीत डांबले.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

चिमूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य संतापले, सरपंचांसह कर्मचाऱ्याला खोलीत डांबले.!

दि.५ नोव्हेंबर २०२३ 

Vidarbha News India 

Gram Panchayat : चिमूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य संतापले, सरपंचांसह कर्मचाऱ्याला खोलीत डांबले.!

Political Earthquake in Chandrapur District 

विदर्भ न्यूज इंडिया 

चंद्रपूर/चिमूर : ग्रामीण भागातील राजकारण लयच भारी. इथं कोणत्या मुद्द्यावरून कधी रान पेटेल हे सांगताच येत नाही. कधीकधी घडलेल्या घटनेमागं नेमकं कोणतं कारण होतं, याचा पत्ताच लागत नाही.

अशाच एका अज्ञात कारणामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात असलेल्या येरखेडा ग्रामपंचायतीला सदस्यानं कुलूप ठोकलं.

ग्रामपंचायत सदस्यानं सरपंच व कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. ग्रामपंचायत सदस्यानं नेमकं कोणत्या कारणामुळं हा संताप व्यक्त केला, याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. (Political Earthquake in Chandrapur District after Gram Panchayat member Locked Sarpanch & employees in Office in Yerkheda Village for unknown cause)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचात आहे. गावचं सरपंच संजय गेडाम हे संगणक चालक मितेश डांगे यांच्यासोबत बसून ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत होते. अशातच सदस्य सुधाकर नन्नावरे ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. काही कळण्यापूर्वीच नन्नावरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचं दार बंद केलं व कडीला कुलूप ठोकलं. एकाएकी झालेल्या या प्रकारामुळं सारेच गोंधळात पडले. वारंवार विनंती करूनही नन्नावरे यांनी कुलूप उघडले नाही.

अखेर सरपंच गेडाम व संगणक चालक डांगे यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. चंद्रपूर ग्रामीण भागातील भिसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक उपनिरीक्षक सचिन जंगम व ताफा येरखेडा गावात दाखल झाला. त्यांनाही नेमका प्रकार कळेना. अखेर पोलिस व ग्रामस्थांनी कुलूप तोडून सरपंच व संगणक चालकाला कार्यालयाबाहेर काढलं. या प्रकरणाची गावात चांगलीच चर्चा रंगलीय. येरखेडा हे गाव चिमूर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतं.

गावात हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास डांगे यांनाही बोलावून घेतलं. डांगे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप कशामुळं ठोकण्यात आलं, हे कुणालाही कळेना. त्यामुळं शेवटी डांगे यांच्या समक्ष कुलूप तोडण्यात आलं. या प्रकाराची सरपंच संजय गेडाम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नन्नावरे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केलीय.

येरखेडा गावात घडलेल्या या प्रकारामुळं जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालाय. या प्रकाराची चर्चा जिल्हाभर सुरू झालीय. गावात हा प्रकार नेमका कशामुळं झाला. ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नन्नावरे यांची नेमकी नाराजी तरी काय, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झालीय. नन्नावरे यांनी घटनेनंतर मौन बाळगल्यानं या प्रकारामागील गूढ आणखीनच वाढलंय. गावातील या घटनेमुळं मात्र सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य, पोलिस व ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली हे निश्चित.


Share News

copylock

Post Top Ad

-->