दि. 25.12.2023
Vidarbha News India
Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितलं भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचं कारण..
Baramati News :
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अजित पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेत आपण त्यांच्यासोबत नसल्याचे सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात जसे दोन गट पडले, तसेच काहीसे वातावरण बारामतीतही तयार झाले.
अजित पवार यांनी ही भूमिका घेतल्यानंतर राजकीय डावपेचांचाच हा भाग असावा या उद्देशाने अनेकांनी सुरवातीपासूनच सावध भूमिका घेत या राजकीय नाट्यावर फारसे भाष्य करणे टाळले. कालांतराने अजित पवार यांनी उघडपणे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागत आपण ख-या अर्थाने वेगळी भूमिका घेतल्याचे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला.
कौटुंबिक भेटी गाठी व कार्यक्रम हा भाग वेगळा व राजकीय भूमिका वेगळी असे अजित पवार यांनी वारंवार सांगत आपली भविष्यातील वाटचाल काय असेल हे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.
या नंतरही अनेकांनी हे दोन्ही नेते लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकत्र दिसतील अशी भविष्यवाणी वर्तविली मात्र रविवारी (ता. 21) अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा जाहीरपणे टीका करताना कार्यकर्त्यांनीही ठोस भूमिका घेण्याचे आवाहन करत आपण आता परतीचे दोर कापून टाकल्याचेच नमूद केले.
दोन्ही डगरींवर हात ठेवून चालणार नाही काहीतरी एक भूमिका घेत झोकून देत काम करा, असा सल्ला अजित पवारांनी देताना शरद पवारांनी वयाच्या अडोतिसाव्या वर्षीच वसंतदादा पाटील यांना डावलून वेगळी भूमिका घेतली होती,
मी साठीनंतर ही भूमिका घेतल्याची आठवण करुन दिली. वयाच्या ज्येष्ठतेनुसार आता थांबून मार्गदर्शकाची भूमिका बजावा, असे आवाहन करतानाच आगामी काळात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासोबत राहणार असल्याचे ठामपणे नमूद केले.
या पूर्वी देशपातळीवरील दिग्गजांशी मी थेट संबंध ठेवत नव्हतो, वरिष्ठ वडिलधारी नेतेमंडळी असल्याने मागे राहायचो, आता मात्र माझे व मोदी शहांशी उत्तम संबंध असून ते माझी कामे मार्गी लावतात, याचा आवर्जून उल्लेख करत बारामतीसह राज्यातील सर्वांनाच त्यांनी लाऊड अँड क्लिअर मेसेज दिल्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचा कायमच पराभव झाला. आता मोदींच्या मिशन 350 या मोहिमेसाठी बारामतीची जागा जिंकणेही भाजपला क्रमप्राप्त असल्याने अजित पवार यांच्या माध्यमातूनच ही जागा जिंकणे शक्य असल्याचे मोदी शहांना माहिती असल्याने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्यास केंद्रीय पातळीवरुनच प्रारंभ झाला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार भूमिका घेणार का, अशी कायमच चर्चा राहिली. गेल्या काही दिवसात अजित पवार यांनी योग्य वेळ येताच बारामतीतही सक्षम उमेदवार देऊ असे सांगत ही निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले. आपल्याला राज्यात फिरावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेऊन प्रचार करायचा हे सूत्रही त्यांनी आजच्या मेळाव्यात ठरवून दिलेले आहे.
अजित पवार यांच्या स्पष्ट राजकीय भूमिकेमुळे आगामी काळातील बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही देशातील काही मुख्य लढतींपैकी एक ठरणार यात शंका नाही.