दि. 07.12.2023
Vidarbha News India
Winter Session : अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा हल्ला.! तर फडणवीस यांचे प्रत्युत्तर.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (ता. 07 डिसेंबर) नागपुरात सुरुवात झाली आहे. पण त्याआधी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले यला मिळाले. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 22 जिल्ह्यांमध्ये मिचॉन चक्रीवादळामुळे कापूस, संत्रा, द्राक्ष, कांदा या पिकांबरोबरच धान उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तर, शेतकरी संकटात असताना देखील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकत नाहीत, मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असतात, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या पण पंचनामे होत नाहीत. सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती. फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. याच तालुक्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर आमच्या सरसकट दुष्काळाच्या मागणीनंतर सरकारने 1 हजार 21 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असा सरकार शब्दप्रयोग करत आहे. या 1 हजार 21 महसूल मंडळांना आर्थिक मदत मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. या वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता. चक्रीवादळ, अवकाळी याने झालेले नुकसान पाहता आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याची पाहणी केली. पण सत्ताधारी मात्र तिथे गेले नाहीत. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी जातील, असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी महत्त्वाची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर विशेष बैठक घेत चर्चा करण्याची देखील मागणी केली. पंरतु, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या मागण्यांना प्रत्युत्तर देत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची पूर्ण माहिती घेतलेली नाही. 40 तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे हे दुष्काळी घोषित झाले. जे निकषात बसत नाही पण दुष्काळ झालेले आहे. अशांना राज्य सरकारकडून मदत करण्यात येणार आहे. त्याठिकाणी 1200 मंडळांना दुष्काळ सदृष्य घोषित केले. ज्यांना दुष्काळी घोषित केले, त्यांना जे मिळणार तेच दुष्काळ सदृष्यंना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कुठेही भेदभाव करण्यात येणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी सुद्धा 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा या वर्षी 20 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 टक्के अग्रीम गेले आहे. बाकी शेतकऱ्यांना पुन्हा पैसे देण्यात येत आहेत. दुष्काळ, गारपीट, अवकाळी किंवा अतिवृष्टी या कोणत्याही गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे, असे फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आले.