दि. 30.12.2023
Vidarbha News India
गडचिरोली : रानटी हत्तींच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, आरमोरी तालुक्यातील घटना.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या रानटी हत्तींनी पुन्हा एका वृद्ध महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे उघडकीस आली आहे. कौशल्या राधकांत मंडल (६७ रा.शंकरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबरच्या मध्यरात्री शंकरनगर येथील जंगलालगत असलेल्या घरात मंडल कुटुंब झोपी गेलेले असताना हत्तींच्या आवाजाने ते जागे झाले. आपल्या जवळपास हत्ती आल्याचे त्यांना कळताच जीव वाचविण्यासाठी ते गावाच्या दिशेने जाण्यास निघाले. मात्र, कौशल्या मंडल हत्तींच्या तावडीत सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ घालून पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी प्रसंगावधान राखल्याने नागरिक थोडक्यात बचावले होते.