दि. 26.12.2023
Vidarbha News India
देशात कोरोनापेक्षाही भयंकर आहे 'ही' समस्या! दरवर्षी 1.5 लाख लोकांचा होतो मृत्यू.!
विदर्भ न्यूज इंडिया
दिल्ली : कोरोना महामारीला जगातील सर्वात मोठी महामारी मानलं जातं. 2020 या वर्षीपासून सुरु झालेल्या या महामारीने जगभरात लाखो लोकांचा जीव घेतला. तर भारतातही लाखो लोक या महामारीच्या विळख्यात आल्याने मृत्यूमुखी पडले.
मात्र देशभरात अशी एक समस्या पसरली आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावत आहेत. जेवढी चर्चा कोरोना महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूमुळे होते, तेवढी चर्चा या समस्येविषयी होत नाही.
भारतात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढतेय आणि त्यासोबतच या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढतेय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्टमध्ये काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. मंत्रालयाच्या 'भारतातील रस्ते अपघात 2022' वार्षिक रिपोर्टनुसार, 2022 मध्ये एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले ज्यामध्ये 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 4,43,366 लोक जखमी झाले आहेत.
मृतांची संख्या वाढतेय
सरकारी आकडेवारीनुसार, एक्सप्रेसवेसह देशातील रस्त्यांचं नेटवर्क विस्तारलंय आणि वाहनांची संख्याही वाढली आहे त्यामुळे रस्ते अपघातातही वाढ होतेय. दर 100 अपघातांमागे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येवरून रस्ते अपघातांची तीव्रता निश्चित केली जाते. गेल्या दशकात त्यात झपाट्याने वाढ झालीये. 2012 मध्ये त्याची संख्या 28.2% होती, जी 2022 मध्ये वाढून 36.5% झाली आहे. तसंच, 2020 आणि 2021 मध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे, प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आल्याने रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे.
दर तासाला 53 अपघात
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने सांगितल्यानुसार, गेल्या वर्षी भारतात दर तासाला अंदाजे 53 अपघात आणि 19 मृत्यू झाले. देशभरात एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले. ज्यामध्ये 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 2022 मध्ये रस्ते अपघातात 11.9% ने वाढ झाली आहे, तर मृत्यूची संख्या देखील 9.4% ने वाढली आहे.
वाढती तीव्रता
सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या विश्लेषणानुसार, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगातील 20 सर्वात वाईट देशांपैकी एक आहे. भारतातील रस्ते अपघातांची तीव्रता 38.15 टक्के आहे. म्हणजेच 100 रस्ते अपघातांपैकी अंदाजे 38 गंभीर श्रेणीतील आहेत. इंटरनॅशनल रोड फेडरेशन, जिनिव्हा नुसार, 2020 मध्ये, चीनमध्ये रस्ते अपघातांची तीव्रता 25.22 टक्के आहे, त्यानंतर भारत 2.01 टक्के आणि अमेरिका 2.01 टक्के आहे.
हायवे होताय जीवघेणे
आकडेवारीनुसार, 2022 मध्ये महामार्गांची एकूण लांबी 63.32 लाख किलोमीटर होती. एकूण रस्ते नेटवर्कमध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा वाटा 4.9 टक्के आहे. रिपोर्टनुसार, वाहनांचा 'वेगा' हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे आतापर्यंत 72.3 टक्के अपघात आणि 71.2 टक्के मृत्यू झाले आहेत.
2022 मध्ये तामिळनाडू हे सर्वाधिक रस्ते अपघात असलेले राज्य होते. जिथे 64,105 रस्ते अपघात झाले. जे एकूण अपघातांच्या 13.9 टक्के आहे. तामिळनाडूनंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक 54,432 अपघात झाले, तर उत्तर प्रदेशात 22,595 अपघात झाले. रस्ते अपघात डेटाचे विश्लेषणावरुन कळतं की अपघातात मरण पावलेले बहुतेक लोक 18-45 वयोगटातील होते (66.5%).