दि. 16.01.2024
Vidarbha News India
Gadchiroli News : पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार.! वन विभाग कधी दखल घेणार.? संतप्त नागरिकांचा प्रश्न.!
- जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/मूलचेरा : मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली.
नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे.
रमाबाई शंकर मुंजमकर (५५, रा. कोळसापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. सोमवारी मकरसंक्रांतीच्या सणासाठी त्या घरी होत्या. सण आटोपून त्या सायंकाळी ५ वाजता गावालगतच्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. मार्कंडा वनपरिक्षेतत्राला चिकटून शेत असून तेथे आधीच वाघ दडून बसलेला होता. या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या मृत्युमुखी पडल्या. रात्री सात वाजेनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. यावरून हल्ल्यांनंतर वाघाने रमाबाई मुंजनकर यांना फरफटत जंगलात नेले असावे, असा कयास बांधला जात आहे. मयत रमाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, मूलचेरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी चमूसह धाव घेतली.
गडचिरोली, अहेरीनंतर मूलचेरातही बळी
जिल्ह्यात गतवर्षी वाघाने सहा जणांचा बळी घेतला होता. यंदा १५ दिवसांत तीन बळी गेले आहेत. ३ जानेवारीला गडचिरोलीजवळील वाकडी जंगलात महिलेला ठार केले होते, ७ जानेवारीला अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे कापूस वेचताना महिलेवर हल्ला करून बळी घेतला होता तर १५ जानेवारीला मूलचेरा तालुक्यातही वाघाने महिलेस ठार मारले. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष अधिक टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Gadchiroli News : Woman killed on the spot in another tiger attack. When will the forest department take notice? The question of angry citizens.!