दि. ०७ जानेवारी २०२४
गडचिरोली : कापसाच्या शेतात कामासाठी गेलेल्या महिलेला वाघाने केले जागीच ठार.! Gadchiroli - Aheri News
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/अहेरी : कापसाच्या शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. सुषमा देवदास मंडल (अंदाजे ५०) रा. चिंतलपेठ ता.अहेरी असे महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला ह्या मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील १५ ते २० वर्षांपासून चिंतलपेठ येथे स्थायी झाली.घरी किराणा दुकान असून या गावात त्यांची शेती सुद्धा आहे दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करताना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली असून मंडल परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आपल्या चमुला घेऊन घटनास्थळी रवाना झाले आहे. मागील काही दिवसांपासुन मुलचेरा तालुक्यातील विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे. या अगोदर मुलचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. नुकतेच काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपरअली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते.अन रविवार सकाळच्या सुमारास चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली.
गडचिरोली जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून नुकचेतच ३ जानेवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथे मंगलाबाई विठ्ठल बोळे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला होता. जिल्ह्याच्या उत्तर भागात वाघ आणि रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असताना आता दक्षिण भागातही वाघाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. चिंतलपेठ येथील घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.