दि. 14.01.2024
Vidarbha News India
गडचिरोली : ट्रकच्या मागील चाकात सापडून वृद्ध जागीच ठार.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : ट्रकच्या मागील चाकात येऊन वृद्धाचा चेंदामेंदा हाेऊन ताे जागीच ठार झाला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे रविवार १४ जानेवारी राेजी सकाळी १०:४५ वाजता घडली. कालीपद राजेंद्र बिश्वास (९०) रा.आष्टी (ता. चामाेर्शी), असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
आष्टी येथील एका रेस्टाॅरंटच्या समाेर एम. एच. ३३ टी. ७४७४ क्रमांकाचा ट्रक उभा हाेता. चालक नितीन सुधाकर कन्नाके (३०) रा. मार्कंडा याने हायवा ट्रक आंबेडकर चाैकाकडे जाण्यासाठी वळवला. याचवेळी कालीपद राजेंद्र बिश्वास हे आपल्या घराकडून बस स्टॉपकडे पायदळ येत हाेते. ते ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. अपघाबाबत माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले हे घटनास्थळी पोहाेचले व मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. दरम्यान ट्रक चालक नितीन याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.