दि. 06 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India
Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा धान खरेदी घोटाळा.?
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मागील वर्षी झालेल्या धान खरेदी घोटाळ्यात गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक गजानन कोटलावार याला निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच पुन्हा एकदा धान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत जराते यांनी म्हटले आहे की, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यात येते. सध्या आदिवासी विकास महामंडळाचे ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनचे २१ असे साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर ही धान खरेदी सुरु असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करून लूट करण्यात येत आहे. शासन नियमाप्रमाणे खरेतर एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र, जिल्हाभरातील सर्व धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी वजनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकाराबद्दल शेतकरी जेव्हा विचारणा करतात तेव्हा, हे अधिकचे वजन ओलाव्याचे म्हणून घेण्यात येत आहेत, असे उत्तर दिले जात आहे. मात्र एका गोणीमध्ये (पोते) ४० किलो ६०० ग्रॅम वजनातून शासन खरेदी केंद्र किंवा अभिकर्ता संस्थांकडून ओलाव्याची तूट गृहित धरून ३८ किलो ५०० ग्रॅम वजन धानाचीच उचल करीत असल्याने शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रतिगोणी वजनाने केली जात असलेली खरेदी ही शुद्ध लूट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० लाख क्विंटलपेक्षा अधिकची धान खरेदी करण्यात आलेली असून यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोट्यावधींनी फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक खरेदी केंद्रांवर आपली खास पथके पाठवून व पोत्यांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या वजनाची तपासणी केली जावी, या महालुटीची शहानिशा करण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून अधिकच्या खरेदीची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अशी मागणीही रामदास जराते यांनी केली आहे.
Gadchiroli: Paddy purchase scam again in Gadchiroli district.?