दि. 08 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India
Gadchiroli : पोलीस-नक्षल्यांत चकमक, मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गडचिरोली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारी रोजी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी परिसरात रेकी करायला आलेल्या नक्षली व पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक झाली.
नक्षल्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळून लावला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या थराराने नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीत पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे.
सशस्त्र नक्षलवादी कॅडर वांगेतुरीपासून ७ किलोमीटर अंतरावर हिद्दूर गावात तळ ठोकून असून पोलिसांनी नव्याने उघडलेल्या वांगेतुरी व गर्देवाडा पोलिस मदत केंद्राची रेकी करून हिंसक कारवाईच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी -६० जवानांकरवी नक्षलविरोधी अभियान राबविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी कांकेर, नारायणपूर, वांगेतुरी, हिद्दूर परिसरात झाडाझडती सुरू केली. ७ फेब्रुवारी रोजी रात्री हिद्दूर गावालगत ५०० मीटर अंतरावर पोलिस जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार करण्यात आला. सुदैवाने पोलिस सुरक्षित आहेत. दरम्यान, पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षली घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेले. परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
घातक शस्त्रसाठा जप्त
नक्षल्यांनी धूम ठोकल्यानंतर परिसरात झडती घेतली असता घातक शस्त्रसाठा आढळून आला. पिथस, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हूक, सोलर पॅनेल व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.
Gadchiroli: Encounter between police and Naxalites, Gadchiroli police in possession of a large stockpile of weapons. arsenal