Gadchiroli : उद्धट वागणूक देणारे 3 डॉक्टर निलंबित, काय आहे प्रकार.? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Gadchiroli : उद्धट वागणूक देणारे 3 डॉक्टर निलंबित, काय आहे प्रकार.?

दि. 14 मार्च 2024 
Vidarbha News India 
Gadchiroli : उद्धट वागणूक देणारे 3 डॉक्टर निलंबित, काय आहे प्रकार.? 
Gadchiroli Physical Assault On Minor : 
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : जारावंडी परीसरात लैंगिक अत्याचार पीडित पाच वर्षांच्या चिमुकलीची उपचाराअभावी हेळसांड झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी बुधवार (ता.13) जारावंडीत कार्यरत तीन मानसेवी डॉक्टरांना निलंबित केले. तसेच जारावंडीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी राहावा, यासाठी तेथे नियुक्त असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांच्याकडील जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यासाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर आरोग्य केंद्राच्या शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार 9 मार्चला समोर आला होता. पीडितेला घेऊन नातेवाईक जारावंडी आरोग्य केंद्रात गेले असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना पेंढरी गाठावे लागले.

पेंढरीतील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांनी नंतर गडचिरोली गाठले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पीडितेला नागपूरला हलवावे लागले. दरम्यान, या प्रकरणानंतर अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेची विदारक स्थिती चव्हाट्यावर आली. 11 मार्चला मोर्चा काढून संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रास टाळे लावले होते. मंगळवार (ता. 12 ) जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी जारावंडीला भेट देऊन स्थानिकांना कारवाईचे आश्वासन देत कुलूप उघडले व आरोग्य सेवा पूर्ववत केली.

त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याकडून अहवाल मागवला. त्यानंतर जारावंडी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त डॉ. अर्चना हिरेखण, डॉ. जागृती गावडे व डॉ. राकेश हिरेखण यांची सेवासमाप्ती करण्याचे आदेश आयुषी सिंह यांनी जारी केले. मुख्यालयी गैरहजर राहून पीडितेवर उपचारात हलगर्जी केल्याचा या सर्वांवर ठपका आहे.

यासोबतच डॉ. राकेश हिरेखण यांच्यावर नागरिकांना उद्धट वागणूक देत असल्याचाही आरोप आहे. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जारावंडीत नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांच्याकडे जिल्हा हिवताप अधिकारीपदाचाही अतिरिक्त पदभार आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे त्यांचे मूळ नेमणुकीच्या ठिकाणी दुर्लक्ष झाले. याकरिता नियमित जिल्हा हिवताप अधिकारी नियुक्त करावा. जेणेकरून डॉ. लोकेशकुमार कोटवार यांना मूळ पदभार असलेल्या जारावंडीत पूर्णवेळ सेवा देता येईल, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी आरोग्य उपसंचालकांना पाठवला आहे. 

Share News

copylock

Post Top Ad

-->